Wednesday, February 6, 2008

पॅसिफ़िक विशेष: माझा न्यु झीलंड दौरा

(सूचना: प्रत्येक फ़ोटोवर क्लिक केल्यास ते मोठ्या आकारात पाहायला मिळतील)


मिल्फ़ोर्ड साउंड प्रदेश


प्रकरण पहिले: न्यु झीलंड- एक देखणा अनुभव


पावसाळी वातवरणात एका आडगावात, डोंगराच्या पायथ्याशी, इंद्रधनुष्यापुढे, पावसाच्या सरींनी चकाकत असलेले एकुलते एक घर, किंवा एका भल्यामोठ्या रस्त्यावर जवळच्या डोंगराएवढीच जुनी झाडे व बदलत्या ‌ऋतुमुळे झालेली त्याची रंगीबेरंगी पाने असलेले वॉलपेपर मी कित्येकवेळा तरी पाहिलेत, पण प्रत्यक्षात कधी अनुभवले तरी नाहीत. वाटायचे की असे देखावे कुठे बरं असतील? व असल्यास इतक्या लहान गावातली माणसे कशी रहात असावीत? नंतर वाटायचे की हे खोटे असावे, सोडून द्यायचो. पण जवळ जवळ असाच अनुभव मला माझ्या न्यु झीलंडच्या दौ~यात आला. तिकडले देखावे तर थक्क करण्याइतपत सुंदर…
न्यु झीलंडला जायचे निमित्त होते ते फ़क्त कोन्फ़रंसचे. त्यासाठी टाकलेले रीसर्च पेपर आणि पोस्टर त्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले. कोन्फ़रंस न्यु झीलंडच्या दक्षिण बेटाच्या पुर्व किनार्यावर क्राइस्टचर्च या शहरात होणार होती. २९ जानेवारीला जाण्याचा दिवस उजाडला. १७.३० चे विमान वेळेवर सुटले व क्राइस्टचर्चला रात्री २३.५५ ला आले. होटेल वर पोहोचेपर्यंत रात्रीचे २ वाजले. नशीबाने एक सुपरमार्केट उघडे होते. जाउन जेवण आणले व झोपेपर्यंत रात्रीचे २.३० वाजले. पुढचे दोन दिवस कोन्फ़रंसमध्ये मोठे मजेशीर गेले. संध्याकाळी मला थोडा वेळ मिळायचा. ३० जानेवारीला संध्याकाळी मी एक फ़ेरी क्राइस्टचर्च शहराला मारुन आलो. माहितीकक्षात उपयुक्त माहिती काढली. पण काही ठिकाणे मी पाहणारच होतो.



क्राइस्ट्चर्च शहरातील एक चर्च.



त्या चर्च शेजारी हा देखावा



चर्चच्या डाव्या बाजुस हा क्रॉस


मागच्या रात्री झोप कमी मिळाल्याने मी हा दिवस लवकर संपवला. तरी झोपेपर्यंत २२.३० वाजले. न्यू झीलंड मध्ये उन्हाळ्यात डे लाइट सेविंग्स असल्यामुळे, इकडची घड्याळे नियोजित वेळेपेक्षा १ तास पुढे असतात म्हणजे संध्याकाळचा वेळ बाहेर फिरायला चांगला (उजेडात) वापरता येतो. सुर्यास्त २१.०० ला व्हायचा आणि चक्क २१.३० वाजे पर्यंत उजेड असयचा. त्यामुळेच रस्त्यावर चांगलीच वर्दळ असायची. दुस~यादिवशी संध्याकाळी मी सनमर पार्क या उपनगरात गेलो. इकडे थोडी लोकं डोंगरावर राहतात. डोंगराच्या उतरणीवर हे आपले आलीशान बंगले कशे बांधतात हे एक नवलच होते.


सनमर पार्क डोंगरावरील त्या पाउलवाटेवरुन द्रुश्य


त्याच डोंगराला वळसा घालुन एक पाउलवाट समुद्राच्या बाजुने जाते. मी ती अर्धी पाउलवाट पार करुन खाली उतरलो. द्रुश्य खूप सुन्दर होते. समुद्राच्या बाजुने तसाच चालत चालत बस स्टॉप वरुन सिटी मार्गे परत होटेल वर आलो.


तिस~या दिवशी कोन्फ़रंस दुपारी १२.३० पर्यंत संपणार होती, म्हणून वेळ ज्यास्त मिळणार होता. होटेल वर येऊन मी सरळ अंटार्टिक सेंटर मध्ये जाण्य़ासाठी बस पकडली. वास्तविक क्राइस्टचर्च मधल्या याच अंटार्टिक सेंटर वरुन अमेरिकेची अंटार्टिक मिशनची उड्डाने होतात व ह्या सेंटरला जागतिक सम्मान मिळालेला आहे. इथे अंटार्टिक मधील मिशनवर जाणारे वैज्ञानिक इतक्या थंडीत कसे राहातात, अंटार्टिकाला उन्हाळ्यात सुर्य का मावळत नाही, तिकडले पेंग्वीन, कुठल्या कुठल्या देशांची अंटार्टिकात स्थळे आहेत ही सर्व माहीती होती. भारताचे "मैत्री" नामक स्थळ ही अंटार्टिकात वास्तव्याला आहे व वर्षातुन एकदा तिकडे भारतीय वैज्ञानिक जातात. ऑस्ट्रेलियाची ३ स्थळे आहेत व वर्षातुन ३ वेळा तिकडे वैज्ञानिक जातात. या व्यतिरीक्त अंटार्टिकात वादळे कशी होतात याचे प्रात्यक्षीक आम्हाला दाखवले. आम्हाला एका बर्फ़ाच्या थंड खोलीत नेउन अचानक वारे सुरु केले व तापमान -२१ डिग्री सेल्सियस वर नेले.



मीच तो, अंटार्टिकाच्या वादळात सापडलेला



बघा बघा, तापमान -२१ वर जाताना.


थोड्याच वेळात बारिक बर्फ़ पडु लागला व गारठा अजुन वाढला. आम्ही २० मिनिटे त्या खोलीत होतो. सहाजिकच आम्हाला घालायला जॅकेट, टोपी व बुट दिलेले. विमानतळ शेजारीच असल्यामुळे, तिकडेच एका कोपर्याला अमेरिकेचे अंटार्टिकात उतरणारे विमान थांबले होते.



हेच ते अंटार्टिका वारी करणारे विमान


बर्फ़ात हे विमान कसे उतरते त्याचा एक शो आयोजित होता. नंतर संध्याकाळी मी न्यु ब्राइटन पियर वर गेलो, समुद्राचा आनंद घ्यायाला. दिवस थंड होता व पाउस पडत होता. तिथे मला चेक रिपब्लिकहुन आलेला एक पर्यटक भेटला. थोडीफ़ार बोलणी केल्यावर, थोडे फ़ोटो काढुन घेतल्यावर मी त्या थंड वातातरणातुन बाहेर आलो.



संध्याकाळची सफ़ारी न्यु ब्राइटन पियर वर.


दुसर्या दिवशी सकाळीच मला ट्रेन पकडायची होती, म्हणून नंतर मी क्राइस्टचर्च रेलवे स्टेशनच्या शोधात गेलो. जवळच होते व थेट बस होती.
या नंतर माझा खरा न्यु झीलंड प्रवास सुरु झाला. दि. ०२/०२/०८ रोजी सकाळी ०८.१५ वाजता मी क्राईस्टचर्च हुन ग्रेमाउथपर्यंत नेणारी जगातल्या सर्वात सुंदर ट्रॅकहुन जाणारी ट्रॅन्स-सीनिक रेल्वे पकडली.




ट्रॅन्स सिनीक रेलवे: स्प्रिंगफ़िल्ड स्टेशनात आली असता.



ग्रेमाउथ हे दक्षिण बेटावरील पश्चिमेकडील शहर. म्हणजे माझा प्रवास एका टोकापासुन दुस~या टोकापर्यंत होता. गाडी वेळेवर सुटली. स्प्रिंगफ़िल्ड, आर्थरस पास मार्गे ही गाडी ग्रेमाउथ ला दुपारी १२.४५ वाजता पोहोचणार होती. बहुतेक सहप्रवासी इंग्रज/ अमेरिकन पर्यटक होते. त्यात एकच भारतीय नवविवाहीत जोडपे होते. बहुधा हनीमुनला आले आसावे. हळूहळू गाडीने वेग घेतला. कधी न्यु झीलंड मधली शेती तर कधी हरीण, मेंढ्यांचे कळप दिसायचे.

आभाळच्छेदीत डोंगर, स्प्रिंगफ़िल्ड स्थानकावरुन

स्प्रिंगफ़िल्डला जेंव्हा ही गाडी काही प्रवासी घेण्याकरिता थांबली तेव्हा आभाळांच्या गर्दीत हरवलेले पर्वतही दिसू लागले. हिरवी- पिवळी शेती, लांबच-लांब पर्वतरांगा व आल्पाइन (क्रिसमस ट्री) सारखी दिसणार्या झाडांच्या रांगा आणि त्यात पावसाळी वातावरण. ह्या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक ३ डब्यानंतर एक समोर दिसणारे आकर्षक द्रुश्य पाहण्याकरीता/ फ़ोटो घेण्याकरिता एक बालकनी सारखा डबा जोडलेला होता. ह्या डब्याला खिडक्या नसल्यामुळे तुफ़ान वारा असतो.


तोल सावरत, त्या "वादळी" बाल्कनीत कसा बसा उभा होतो. मीच न्हवे, ते फ़ोटो काढणारे सुद्धा.
शिवाय गाडीच्या वेगात तोल सांभाळणे कठीण जायाचे. विशेष म्हणजे, काही मोठ्या स्टेशनात रुळ बदलण्याची सेवा वगळता, या पुर्ण मार्गावर एकच रुळ होता. हीच गाडी जायची आणि परत यायची.यामुळे कधी कधी पलीकडुन कोळश्याच्या वाघिणी घेउन जाणारी गाडी आली की आमची गाडी जाई पर्यंत तिला थांबावे लागयचे. स्प्रिंगफ़िल्ड स्टेशन सोडल्यावर मी त्या बाल्कनी डब्यात जाऊन उभा राहिलो. स्वेटर घालुन सुद्धा वारा झोंबत होता. हळूहळू पुढे नयनरम्य द्रुश्य दिसु लागले. विशाल पर्वत रांगांमधुन वाट काढना~या नद्या दिसू लागल्या.



नद्याच नद्या, झरेच झरे.


अति उंचावरुन आमची गाडी धडधडत होती. डोंगरांच्या दरीत असे कितीतरी पुल होते. किती तरी बोगदे होते. माझ्या मते, सुमारे १८ बोगदे आम्ही पार केले असावेत. प्रत्येक बोगद्याबाहेर आल्यावर एक वेगळेच द्रुश्य दिसायचे.


कोणी शोधला असेल हा प्रवाह?


पुढे तर हे झरे एका विशाल महानदीत समावत होते. मनमोहक असे हे द्रुश्य होते. कठीण कठीण वळणे हळुवार घेत, गाडी आम्हाला बरेच चित्र काढायची संधी देत होती.

खाद्या वळणावर, पुढे बोगद्यात जाताना ट्रॅन्स सिनीक

सर्व नद्यांचे पाणी इतके स्वच्छ की आतला तळ दिसायचा. शेवाळ नाही व दगड अगदी पांढरे-शुभ्र आणि पाणी तर पिण्यायोग्य आकाशाएवढेच निळे. कधी डाव्या तर कधी उजव्या बाजुस देखावे यायचे आणि एकच फ़ोटो घेणार्य़ांची एकच धांदल उडायची. पुढे आम्ही आर्थरस पास जवळ आलो. काही प्रवाशी येथे उतरले. हे गाव एका दरीत आहे. अजुबाजुला डोंगराळ प्रदेश व म्हणुन होटेलांचे दर स्वस्त होते. वास्तविक ज्यांना जंगलातून फ़िरण्याची हौस होती तीच माणसे इथे उतरलेली असावीत असे मला वाटले.

आर्थर्स पास स्थानक




आर्थरस पास स्थानकात, बाजुला कोळश्याच्या वाघिणी थांबलेल्या.



बोगद्यात शिरण्याआधी


आर्थरस पासला सुमारे ८५०० मिटर लांबीचा बोगदा आहे - ओटिरा बोगदा. हा बोगदा कॅन्टरबरी (क्राइस्टचर्च व आजूबाजूचा परिसर) आणि पश्चिम न्यु झीलंड ला जोडण्यास फ़ायद्याचा ठरतो. गाडी सुमारे ५ मिनिटांनी या काळोखातून बाहेर पडली. नंतर थोडावेळ एका नदीच्या किनारावरुन गाडी जाउ लागली. हिवाळयात या आजुबाजूंच्या डोंगरावर बर्फ़ पडलेला असतो व उन्हाळ्यात हाच बर्फ़ वितळतो आणि पाणी नदीत समावते.



नयनरम्य पुल





बहुधा बर्फ़ वितळलेला असावा या डोंगरावरचा


घड्याळाचे काटे फ़िरत होते व आम्ही ग्रेमाउथ जवळ येत होतो. त्या डोंगराळ प्रदेशातून जाताना वेळ कसा गेला हे कळलेच नाही. माझी तहान-भुकच नाहीशी झाली. पुढे एका तलावात काही माणसे आम्हाला बोटिंग करताना व मासे पकडताना दिसली.



ग्रेमाउथ जवळचा तलाव


नंतर थोड्याच वेळात एक खाडी लागली व आता आमची रेलवे एका हायवे ला समांतर जात होती. खाडी वरील एक पुल आला व दुसर्याच क्षणी ग्रेमाउथ स्टेशन आले व हा ट्रेन प्रवास बरोबर १२.४५ वाजता संपुष्टात आला.


प्रकरण दुसरे: ग्रेमाउथ ते फ़ॉक्स ग्लेसियर


मी बॅगेज कार जवळ जाऊन माझे सामान घेतले. नाइलाजाने माझे कोन्फ़रंसची पोस्टर्स देखील माझ्याबरोबर फ़िरत होती. पण मला ग्रेमाउथ मध्ये रहायचे नव्हते. मला जायाचे होते ते दक्षिणेकडील फ़ॉक्स ग्लेसियर या गावात. आता इथून पुढे रेलवे नव्हती. तर १३.३० वाजता बसचे (कोचचे) बुकिंग केलेले व बस स्थानक, रेलवे स्टेशन शेजारीच होते. एव्हाना मला खूप भूक लागलेली. इतका वेळ मी हवा खात बसलेलो ट्रेन मध्ये. समोर मॅक डोनल्डचे जाहिरात फ़लक दिसले पण ५-७ मिनिटे चालल्यावर सुद्धा मला काय ते दुकान सापडले नाही. लांब जाऊन उगाच बस चुकू नये म्हणून मी माघारी फ़िरलो. बरोबर पुष्कळ प्रवासी होते. ते जोडपे सुद्धा होते. मी २-३ वेळा त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, सोडून दिला. पाणीही संपल्यामुळे समोर सब-वेच्या दुकानात जाऊन पाणी आणले. क्राइस्टचर्चहून बरोबर भरपूर बिस्कीटे मी घेतलेली. फ़ॉक्स ग्लेसियरचा प्रवास सुमारे ४ तासांचा होता. शेवटी गाडीत बिस्कीटे खाण्याचे ठरवले. कारण पाऊस पडत होता आणि हात सामानात गुंतलेले व बसायला नीट जागा नव्हती. इंटरनेटवर बस बुकिंग केल्यामुळे मला तिकिट स्वस्त पडले. पण नंतर मला विचार आला की बहुतेक मला शेवटची सीट मिळेल. थोड्याच वेळात मी बुकिंग केलेल्या कंपनीची बस आली. पण ही बस उत्तरेकडे नेल्सनला चालली होती. काही उतारु प्रवाशी होते तर काही प्रवासी त्यात चढले. नंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या इतर दिशेस जाणार्या बसेसही सुटल्या. एव्हाना बरेच प्रवाशी आपआपल्या बसेस मध्ये गेलेले. काही वेळाने माझी बस आली. बस भरलेली होती व ही बस उत्तरेकडून (नेल्सनहून) आलेली जिथे मगाचची बस चाललेली. बरेचशे प्रवासी उतरले कारण आता ती ट्रान्स-सिनीक रेलवे परतीच्या प्रवासाला निघाली. आम्ही मोजून अवघे १०-११ नवीन लोकं होतो. ड्रायवरला तिकीट दाखवून मी आंत जाऊन एक चांगलीशी जागा पकडली.


बरोबर १३.३० वाजता ही गाडी फ़ॉक्स ग्लेसियरच्या गावाकडे रवाना झाली. आता रस्ता होता तो समुद्र किनार्या लगतचा. बाहेर ऊनही होते व आत मस्त ए/सी मध्ये मी बिस्कीटे खाऊन थोडीफ़ार झोप काढली. जाग आली ती ड्रायवरच्या आनाउंसमेंटमुळे. आम्ही १४.२० ला जेवायला थांबणार होतो. होकितिका या गावात.



होकितिका गावाचा हा क्लॉक टॉवर


ह्या गावात म्हणे "जेड" (कदाचित मराठीत याला पाषाण म्हणतात) नावाचा दगड सापाडतो त्यामुळे एके काळी या गावात खाणी होत्या, खूप वैभव होते. जेड नावाचा दगडावर कोरीव काम करुन नक्षीमय आकार देऊन फ़ेंग शुई सारख्या शास्त्रात वापरतात. मुली हा दगड गळ्यात देखील घालतात. आता सरकारने या खाणी बंद केल्या पण काही कारखाने येथे अजुन देखील सुरु आहेत. खाली उतरून सहप्रवाशांशी ओळख केली. एक कलकत्याचे काका एकटेच ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड दर्शनाला आलेले. बहुधा ७०-७५ वयोगटातील असावेत. म्हणाले ते एकटेच फ़िरतात. मेक्सीको, विएतनाम, जर्मनी, ऑस्ट्रिया वगैरे राष्ट्रे फ़िरुन असावेत असे त्यांच्या बोलण्यावरुन कळले. ते महीनाभर न्यु झीलंड मध्ये रहाणार होते. त्यांना एकटे पाहून मला नवलच वाटले. आतापर्यंत ते जोडपे देखील आमच्याशी बोलायला लागलेले. ते देखील मुंबईचेच होते कफ़ परेड भागातले. पुढे आम्हा चौघांचा कळप त्या जेड फ़ॅक्टरीत निघाला. तिकडले कोरीव काम केलेले दगड पाहुन खूप छान वाटले. बाजुलाच एक छोटेसे पुस्तक होते. त्यात या सर्व नक्षीकामाबद्दल महिती होती व प्रत्येक नक्षीचा अर्थ होता. एखाद-दुसरे फ़ोटो काढून आम्ही पुन्हा गाडीच्या दिशेने जाऊ लागलो.


कधी डोंगर-घाटातून तर कधी समुद्र किना~याजवळून आमची बस फ़ॉक्स ग्लेसियरच्या दिशेने निघाली. वाटेत आम्हाला भरपूर गोड पाण्याचे तलाव दिसले. असे म्हणतात की फ़ार वर्षापूर्वी जेंव्हा प्रुथ्वीवर बर्फ़ होता तेंव्हा न्यु झीलंडवर पुष्कळ असे हिम सरोवर होते. कालांतराने प्रुथ्वीचे तापमान वाढु लागले व बर्फ़ वितळू लागला. याच वितळलेल्या बर्फ़ाचे हे तलाव बनले. नैसर्गिक रीत्या जन्मलेले हे तलाव या देशाने व्यवस्थित जपून ठेवले आहेत. फ़ॉक्स ग्लेसियरच्या मार्गावर आम्हाला असे ३ तलाव दिसणार होते. इयांथी, मताही व मपौरिका !





इयांथी तलाव



मताही तलाव



मपौरिका तलाव



याच रस्त्यावर एक गाव होते. बहुधा हे जगातले सर्वात छोटेसे गाव असावे. या गावातली लोकसंख्या होती फ़क्त २. इयांथी तलाव गेल्यावर आम्हाला एक गाव लागले, हरी हरी. १९३१ साला मध्ये एक २ माणसांचे विमान सिडनीहुन निघाले व ते भरकटले. ते जेमतेम या गावात उतरले. तेच हे हरी हरी. लोकं म्हणतात की त्या पायलटने सुखरुप उतरल्यावर हरी-हरी हे दोन शब्द उच्चारले व हे नाव गावाला पडले. मात्र त्या विमानाचे नुक्सान झाले. ते विमान अजुन ही तिथे ठेवले आहे. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे, इकडल्या नदी वरील काही पूल फ़क्त एकतर्फ़ी वहातुक करण्याजोगेच रुंद आहेत. रेलवेगाड्या आणि मोटार गाड्यांसाठी दोन्ही याच एका एकतर्फ़ी पुलावरुन जातात. सहाजिकच रेलवे आली की मोटार वहातुक थोड्यावेळांकरिता थांबते. आश्चर्याची बाब म्हणजे अश्या पुष्कळ पुलांवर लाल दिवा अथवा कोणी वॉचमन नव्हता. पुढे आमच्या बस ने वळण घेतले ते फ़ॉक्स ग्लेसियरच्या दिशेने. फ़्रॅन्स जोसेफ़ गाव लागले तेंव्हा आमच्यातली काही मंडळी तेथे उतरली. ते कलकत्याचे काका व ते जोडपे ही इकडे उतरले. फ़्रॅन्स जोसेफ़ ला मला पहिला हिम सरोवर दिसला व त्या हिमसरोवरावर चालण्याच्या पुष्कळ टुर्स होतात. आता फ़ॉक्स ग्लेसियर हे गाव फ़क्त २५ कि.मी वर होते. पण रस्ता खूप वळणदार व घाटातला होता. प्रत्येक वळण एखाद्या U-टर्न सारखे व अतिशय उतरणीवर. एका बजुला डोंगर तर दुसर्या बाजुला खोल दरी व खाली वाहणारी एखादी नदी असायची. आपला कशेडी घाट यापेक्षा कितीतरी बरा असे मला वाटले. पुष्कळ असे ब्लाइंड स्पॉट्स होते जेथे समोरची गाडी दिसू शकत नव्हती.



घाट चढताना दिसणारी एक नदी.


थोड्याच वेळात फ़ॉक्स ग्लेसियर आले. आम्ही उतरलो व बस रिकामी झाली. खूपच छोटे असे हे गाव होते. मोजकीच दुकाने/ होटेल्स व मोजकीच घरे.



इवलेसे हे गाव-फ़ॉक्स ग्लेसियर.



चारी बाजूला डोंगर व घनदाट जंगल. सगळीकडे रातकिडे चुकचुकत होते. मी इकडे होटेल मध्ये रूमवर गेलो सामान ठेवुन आंघोळ केली व फ़ेर फ़टका मारायला खाली उतरलो.


घर असावे तर असे !



उन पावसाचा खेळच जणू



फ़ॉक्स टाउनचा डोंगराळ प्रदेश



नंतर मी टूरिस्ट ऑफ़िस मध्ये जाऊन दुसर्या दिवशीची टूर कंफ़र्म केली. वेज. पिझ्झा आणला. खाल्ला आणि झोपी गेलो कारण सकाळी हिम पर्वतावर/सरोवरावर चालायला जायचे होते.


प्रकरण तिसरे: बर्फ़ावर एक दिवस




हिम सरोवर


सकाळी ०९.०० ला मी टूरिस्ट ऑफ़िस मध्ये गेलो. हिम पर्वतावर चांलणे तितकेसे सोपे नव्हते. स्वेटर आणि गॉगल माझ्याजवळ होताच. आम्ही २० जणं होतो. हिम सरोवरावर चालायचा कोणालाच अनुभव नव्हता. ऑफ़िस मध्ये आम्हा सर्वांची तपासणी केली. आम्हाला स्पेशल बुटं, जाड मोजे, जॅकेट व टोपी घालायला दिली आणि बस मध्ये बसवून आम्हाला फ़ॉक्स ग्लेसियर या हिम सरोवरावर नेले. तिथे पोहोचताच पहिले द्रुश्य पाहीले ते असे. आमचे १०-१० जणांचे २ ग्रुप केले व दोन गाइड दिले होते. माझ्या ग्रुप मध्ये बहुतेक इंग्लंड मधील मुले व एक ऑस्ट्रलियन नागरिक होता. त्यात माझ्या बस मधील एक सहप्रवासी, लंडनची एक तरुणी रिबेका सुद्धा होती. ही ५ महिन्यासाठी जागतिक टुर वर निघाली होती. अगदीच ओबड-धोबड असा हा बर्फ़ होता. त्यावर चालणे मोठ्या जोखमीचे होणार होते. बर्फ़ावर जाण्याचा सोयीचा रस्ता देखील डाव्या हाताच्या जंगलातून जातो. पण त्या डोंगराच्या पायथ्याशी पोचायला एक लहानशी नदी ओलांडायची होती. ती नदी ओलांडून आम्ही एका लहान धबधब्याच्या मार्गाने अर्ध्या डोंगरावर चढलो. चढणे कठीण होते कारण दगडे गुळगुळीत झालेली. वर आल्यावर एक लहान पण वेडी-वाकडी पाउलवाट होती. एका बाजुला खोल दरी. कधी वर तर कधी खाली जायला पायर्या असायच्या आणि या पायर्या खूप लहान. पाय जपून ठेवावा लागे. एखादी पायरी घसरली तर पुढचे काही खरे नव्हते. उतरणीच्या पायर्या खूप जड जायच्या कारण उतरताना समोरची खोल दरी मनात भीती घालायची. हा प्रवास खूप कठीण होता. डोंगरावर वितळणारा बर्फ़ असल्यामुळे, काही दगडांची पकड सैल व्हायची व त्यामुळे दरडी कोसळण्याचा दाट संभव होता. मध्ये मध्ये त्याचे भयाण दर्शन ही घडायचे. म्हणुन जागो जागी फ़लक होते "पुढील १००/२०० मीटर थांबू नये, इथे दरड कोसळ्याचा दाट संभव आहे."



मागे कोसळलेल्या काही दरडी दिसत आहेत.


पण कधीतरी एवढा अवघड डोंगर एकदम चढताना दमायला हे व्हायचेच. पुढे आम्ही चांगल्याश्या ठिकाणी थोडावेळ थांबलो.



नंतर थोडे चालल्यावर एक शिडी लागली व नंतर थोड्या पायर्या लागून आम्ही आता हिम सरोवराजवळ होतो. आम्हाला घालायला बुटांवर लोखंडी काटे दिले व धरायला काठ्या दिल्या. अमच्या गाइड जवळ एक कुर्हाड होती. त्या कुर्हाडीने तो बर्फ़ तोडून आम्हाला चढायला पाय~या करुन देत असे. बर्फ़ावर चालताना पाय जपून ठेवावा लागे. जर बूटाचा पुढला भाग प्रथम बर्फ़ावर पडला तर घसरायला होई. भाग उतरता असल्यामुळे एखादा घसरला तर एकतर घसरत खाली तरी जाईल किंवा जर वितळलेले बर्फ़ घेउन जाणार्या नैसर्गिक गटारात जाऊन पडल्यास, सापडणे कठीण. म्हणून मधोमध बांधलेले लोखंडी काटे बर्फ़ावर ठेवायला लागायचे. अशी कितीतरी नैसर्गिक गटारे आम्ही पाहिली. काही गटारेतर खूप खोल व अखंड मनुष्य त्यात मावेल इतकी मोठी होती. शिवाय गारठलेले पाणी.



असेच एक गटार


साधारणत: अर्ध्यावर गेल्यावर आम्ही आणलेले जेवण खालले. खूप चालल्यामुळे पुष्कळ भूक लागली होती. जसजसे आम्ही बर्फ़ वर चढत होतो, तितकाच प्रवास कठीण होत चालला होता कारण उतरण वाढत होती व आणखीनच घसरण दिसत होती.


बर्फ़ावरील उतरण


आमचा गाइड आम्हाला सांगत होता की "फ़ार वर्षांपूर्वी एक गिर्यारोहक ह्याच हिम सरोवरावर एकटाच वर पर्यंत चढला आणि मध्ये काहीतरी घटना घडली की तो नहिसा झाला. तो असाच एका गटारात वाहवत गेला असावा म्हणून तो सापडला नाही. तो अजून याच बर्फ़ात असावा असा विश्वास आहे. पण तो अखंड सापडणे मुश्किल आहे. कदचित गोठलेल्या अवस्थेत व धारधार बर्फ़ामुळे त्याचे एकेक अवयव वेगळे झाले असावेत म्हणून त्याचे अखंड बाहेर पडणे कठीण आहे . याच कारणामुळे वरच्या भागात पटाईत गिर्यारोहकच जातात". गारठा वाढल्यामुळे मी हात मोजे घातले. थोडे वर गेल्यावर बरीच मोठी अशी गटारे ओलांडायची वेळ आलेली. मनात भीती होती व जपून उडी टाकली.


हा आमचा गाइड मॅथ्यू

पुढे थोडे वर गेल्यावर बर्फ़ात प्रदेशातून समोरचे सुंदर द्रुश्य दिसले.


असे म्हणतात सुमारे २५-३० वर्षांपुर्वी वरच्या चित्रात डोंगरावर डाव्या हाताला दिसणा~या शेवटच्या पांढर्या रेषेपर्य़ंत हा हिम सरोवर पसरलेला होता. वितळत वितळत हा बर्फ़ आज इतका तोकडा झाला. पण आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा भाग मोठा आहे- सहाजिकच बर्फ़ाळ प्रदेश परत वाढतो आहे.


एव्हाना ढग जमा झालेले व पावसाची रिपरिप सुरु झालेली व आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मगाशी गाइड ने आखलेल्या काही पायर्या कधीच वितळल्या होत्या. त्या परत आखत आखत आम्ही हळू हळू बर्फ़ उतरत होतो. उतरताना तोल जाण्याचा संभव होता. २-३ वेळा मी कसाबसा सावरलो. सुमारे तासाभरात आम्ही बर्फ़ाच्या पायथ्याशी आलो व ते बुटाला लावलेले काटे काढुन बाकीचे सामान उतरवले. आता वाट परत जंगलातली होती आणि उतरताना प्रत्येक वेळी समोरची खोल दरी दिसायची. पाउस ही बर्यापैंकी पडत होता. माझे पाणी ही संपले होते व एका मोठ्या झ~यातून मी गार गार पाणी भरून घेतले. चालत चालत बस पर्यंत आलो व बस घेउन आम्हाला पुन्हा ऑफ़ीसवर घेऊन आली. घेतलेले सामान परत केले व मी होटेल वर येऊन छान आंघोळ करून रात्रीचे जेवण आणायला गेलो. खूप दमलो होतो व पायही खूप दुखत होते. जेवून कधी डोळा लागला ते कळलेच नाही.


प्रकरण चौथे: झेप दक्षिणेकडे - क्वीन्सटाउन


दि. ०४/०२/०८ सकाळी लवकर उठून मी तयार झालो. आज मला फ़ॉक्स ग्लेसियर सोडायचे होते व प्रवास होता दक्षिणेकडे, क्वीन्सटाउनला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे. त्याच बस कंपनीचे बुकिंग मी इंटरनेट वरून केले. ०८.३० ला बस येणार होती. मी बस स्टॉप वर जावून उभा होतो. एक इस्त्राएलच्या काकी ज्या मला मागच्या बस प्रवासात भेटलेल्या, त्या सुद्धा होत्या. थोड्यावेळाने रिबेका सुद्धा तिथे आली. बस आली तेंव्हा आत ते कलकत्याचे काका आणि ते भारतीय जोडपे सुद्धा होते. अजून एक ऑस्ट्रियन मनुष्य सुद्धा मला मागच्या बस प्रवासात दिसलेला. तो पण होता. पण तो जरा फ़ारच बोलका असल्यामुळे मी त्याच्याबरोबर संभाषण करायचे आवरले. कोणाशीही तो इतका संभाषण करायचा की त्या बोलणार्याला शेवटी त्याचा कंटाळा यायचा. इस्त्राएलच्या काकींनी तर तो असल्यामुळे थोड्यावेळाने जागाच बदलली. मी जरा त्यांना विचारले की त्यांनी जागा का बदलली, तर त्या बोलक्या माणसाकडे पाहून आम्ही दोघे हसू लागलो. ते कलकत्त्याचे काकाही त्याला कंटाळले होते. अजून एक जापानचे व पोर्तुगालचे मध्यमवयीन जोडपे होते आमच्याबरोबर याच बसमध्ये ज्यांच्याशी माझे ज्यास्त बोलणे झाले नाही. आता पर्यंत बरीचशी मंडळी ओळखीची होती. नवखे असे कोणीच नव्हते.
वितळणारा हिम सरोवराचे पाणी एका नदीत समावत होते. ही नदी पार केल्यावर आम्हाला कधी अभाळच्छेदीत डोंगर तर कधी मेंढ्यांचे कळप दिसे. या मेढ्यांवर पुष्कळ अशी लोकर जमा झाल्याने त्या फ़ार गोंडस दिसत होत्या :-).




ह्याच नदीत वितळलेल्या हिम सरोवरचे पाणी समावते.

आभाळच्छेदीत डोंगर


मेंढ्यांचे कळप


याच समुद्रात मला काही डॉल्फ़िन मासे दिसले


ड्रायवर आपली कॉमेंटरी चालवत, उपयुक्त अशी माहिती देत, पुढे आमच्या बस ने एक वळण घेतले व समुद्राला समांतर अश्या मार्गावरुन जाऊ लागली. या समुद्रात डोल्फ़िन मासे दिसतात पण ते पाण्यात असल्यामुळे मला त्यांचे पंखच पाण्यावर तरंगताना दिसायचे. थोड्याच वेळात आम्ही नाष्ट्यासाठी थांबणार होतो. या होटेलमध्ये रावस मास्याचे शेत आहे, अर्थात रावस मासे इथे पाळले जातात. एका मोठ्या हौदात अनेक रावस मासे फ़िरत होते. आम्हाला रावस माश्याचा नाष्टा कारायचे आमच्या ड्रायवरने सुचवले. सोमवार असल्याकारणाने मी कॉफ़ी घेऊन बाहेर आलो व अजूबाजूला फ़ेर फ़टका मारून पुन्हा बस कडे त्या कलकत्याच्या काकांसमवेत बाहेर आलो. बाजूला सुंदर अश्या वनस्पतीची झाडे होती. सगळ्यांचे नाष्टा झाल्यावर आमची गाडी पुन्हा मार्गावर आली. प्रत्येक क्षणाला द्रुश्य बदलत होते. परिंगा तलाव गेल्यावर एक लहानसा घाट चढताना रमणीय असा समोरचा समुद्र दिसत होता.


परिंगा तलाव

नाईट्स पॉइंट वरून टॅस्मन समुद्र
नाईट्स पॉइंट
आमच्या ड्रायवरने पुन्हा बस थांबवून आम्हाला फ़ोटो काढायची संधी दिली. क्वीन्सटाऊनसाठी जायला हास्ट पास (हास्ट घाट) मार्गे जावे लागते. हा घाट हास्ट नदी व मकारोरा नदीच्या मध्ये आहे व रस्ता निश्चितच जंगलातून जातो. थोड्यावेळाने आम्ही हास्ट नदीच्या तिरावरुन जात होतो व ड्रायवरने परत बस थांबवली. निमित्य होते ते एका धबधब्याचे. हा उंच असा हास्ट नदीवरचा धबधबा होता. नाव होते "थंडर क्रीक" धबधबा. नावाप्रमाणे अस्तित्व ही तसेच होते गडगडणारे !


थंडर क्रीक धबधबा



या परीसरात नेहमी पाऊस पडत असल्यामुळे कित्येक असे सुंदर धबधबे द्रुष्टीस पडत. आता ड्रायवरांची बदली झाली व दुसरा ड्रायवर कामावर रुजू झाला. पुढे आम्ही हास्ट नदी ओलांडून घाट चढू लागलो. एके ठिकाणी खूप खोलवर जाणार्या फ़िश नदीवर पुल आम्ही ओलांडला. ही नदी इतकी रसातळाला होती किंवा पुल इतका उंच होता की खाली पहावेना. जुना पुल असल्याकारणाने ड्रायवरने बस खूप हळू नेली.


खोल फ़िश नदी.

वेडीवाकडी वळणे घेत आम्ही एकदाचा तो घाट पार केला. एव्हाना दुपारचा दीड वाजत आलेला. आम्ही मकारोरा नदी पार करून त्याच (मकारोरा) गावात आलेलो. इकडे थोड्यावेळासाठी आम्ही जेवायला थांबलो. आता रस्ता सपाट होता पण चोहोबाजूला डोंगर हे होतेच.


मकारोरा गावातील हे डोंगर

मकारोरा गावातून बर्फ़ाने झाकलेले पर्वत

एक अनोळखी रस्ता (किमान माझ्यासाठी तरी)

या गावातून मला काही बर्फ़ाने झाकलेले पर्वत थोड्याफ़ार प्रमाणात दिसू लागले. जेवण झाल्यावर सहप्रवाशांशी थोडी बोलणीकेल्यावर आम्ही परत बस मध्ये बसलो. त्या इस्त्राएलच्या काकींना चित्र काढायचे फ़ार वेड होते. आता आम्हाला दिसले ते २ प्रशस्त तलाव, वनाका व हवे. दोन्ही तलाव एकमेकांजवळच होते. वनाका तलावाचे क्षेत्रफ़ळ १९२ चौ.कि.मी होते व त्याची लांबी होती ४२ कि.मी. ह्या तलावाभोवती कित्येक असे उंच पर्वत होते. हा तलाव देखील हिम सरोवराच्या वितळण्याने तयार झाला होता व सभोवतालच्या पर्वतरांगा पाहून हे चित्र नाकारता येत नव्हते. बराच वेळ आमची बस या तलावाच्या तिरावरून चालली.



वनाका तलाव


नंतर तिने परत वळण घेतले तर द्रुष्टीस दुसरा एक विशाल हवे तलाव पडला. या तलावाचे क्षेत्रफ़ळ होते जवळ जवळ १४० चौ. कि मी व लांबी होती ३५ कि. मी. ह्या तलावाच्या इतिहास सुद्धा वनाका तलावासारखाच होता कारण चोहोबाजुला तसेच द्रुश्य होते. हवे तलावाच्या पाण्याचा उपयोग वेजनिर्मितीकरिता होतो.


हवे तलाव

हे दोन तलाव गेल्यावर वनाका गाव लागले. आमच्यातली थोडी माणसे येथे उतरली.



वनाका गाव


इस्त्राएलच्या काकी व रिबेका ही इथे उतरल्या. आता प्रक्रुतीचे रूप झपाट्याने बदलत होते. हिरवेगार डोंगर नाहिसे होवून आता आम्हाला कोरडे डोंगर दिसू लागले.
वनाका सोडून क्वींसटाऊनच्या दिशेने आमची गाडी लागली तेंव्हा मला काही बंगी जंपींगचे (याचा मराठी अनुवाद अजुन शोधतोय)काही "अड्डे" दिसले. क्वींन्सटाऊन यासाठी खूप प्रसिद्ध आहे.


बंगी जंपींग. खाली वाहणारी नदी आहे.

पुढे आम्हाला एक फ़ळांची बाग लागली व ड्रायवरने परत गाडी थांबवली. ताजी फ़ळे व सुकवलेली फ़ळे, मध, फ़ळांच्या औषधी गोळ्या येथे विकण्यासाठी होत्या. ऑस्ट्रेलियात अशे पदार्थ सोडत नसल्यामुळे मी काही येथे विकत घेतले नाही. येथे थोडावेळ घालवून आता गाडी अती विशाल वकाटिपू तलावाच्या किना~यावरील क्वींसटाऊन शहरात पोहोचली. हळूहळू सर्व प्रवाशांना होटेलवर सोडत मला होटेलवर येईपर्य़ंत १६.३५ झाले.
शहर गजबजलेले होते. पाहून मला बरे वाटले. खोलीत येऊन मी आंघोळ केली व कपडे बदलून, कॉफ़ी पिऊन मी परत खाली गेलो. शहर तसे लहानच होते. दूरवर मला काही केबल कार्स वर जाताना दिसल्या.


हीच ती केबल कार-गोंडोला राईड


मी त्याच्या पायथ्याशी गेलो. त्याला पर्यायी असा पायी मार्ग सुद्धा होता. समोरून दोन दमलेले (आणि वैतागलेले) पर्यटक खाली उतरताना दिसले. त्यांना मी विचारल्यावर, वर असे पाहण्यासारखे काहीच नाही असा सल्ला दिला. आदल्या दिवशी बर्फ़ावर चालण्याचा अनुभव पायांना अजून ताजा होताच. तो विचार मी सोडुन दिला. माझे दुसर्या दिवशीच्या टूरचे बुकींग ऑफ़ीस शोधले कारण दुसर्या दिवशी ०७.३० ला तिथे जमायचे होते. बुकींग कंफ़र्म करून मी शहरातील वकाटिपू तलावावर जाण्याकरिता निघालो.


क्वींसटाऊन


वकाटिपू तलावावरील द्रुश्य.

किती वाजलेत सांगू शकाल का? रात्रीचे १०.००

द्रुश्य़ खूपच अवर्णनिय होते. पाणी खूपच स्वच्छ. जवळच्या मॉलमध्ये थोडीफ़ार विंडो शॉपींग करून मी जेवण घेतले. होटेलवर येवून जेवलो. थोडा टि.व्ही पाहून तसाच झोपी गेलो.


प्रकरण पाचवे: मिल्फ़ोर्ड साउंड प्रदेश- एक अविस्मरणीय अनुभव


आज माझा न्यु झीलंड मधला शेवटचा दिवस होता व आज मी जाणार होतो मिल्फ़ोर्ड साउंड प्रदेश पहायला. वास्तविक मिल्फ़ोर्ड साउंड ला कोठला ही आवाज येत नसून हा फ़क्त एक नैसर्गिकरित्या जन्मलेले पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात सुंदर असे हे ठिकाण आहे. हे ठिकाण क्वींसटाउन पासून खूप जवळ आहे (निदान नकाशातुन तरी तसे दिसते) पण वाटेत खूप खडतर डोंगर असल्याकारणाने अजून तो रस्ता बनवला गेला नाही. याचमुळे सध्याचा रसत्यावरुन अंतर ( जो सगळेच पर्यटक घेतात) सुमारे ३०० कि.मी. होते. जाऊन येऊन सुमारे ६२० कि.मी फ़क्त. पण हा ही रस्ता तितकासा सोपा नाही. खूप वळणदार आहे. अंतर पाहून क्वींसटाऊनहून ही टूर सकाळीच निघते. मी सकाळी ६ ला ऊठलो. सकाळी ७.२० ला टूरच्या ऑफ़ीस वर जमायचे होते. वेळेतच पोहोचलो. ही माझी न्यु झीलंड मधली सर्वात महाग टूर होती. बाकीच्या टूर साठी डिस्काउंट मिळल्यामुळे त्या स्वस्त पडल्या, पण यासाठी कठीण होते. असो. सगळे पर्यटक जमा झाले. ७.३० पर्यंत आम्ही सगळे १९ जण (म्हणूनच मला डिस्काऊंट मिळत नव्हते व तिकडे जाण्यासाठी बरेच टूर वाले होते.). बस मध्ये होतो. आज आमची टूर गाइड (व ड्रायवर) होती ट्रेसी.


वेळेत निघालो. सकाळची कोवळे ऊन घेत आमची बस वकाटिपुच्या किनर्यावरुन धावत होती. ८४ कि.मी लांबीचा (क्षेत्रफ़ळ २९१ चौ.कि.मी), 'N' या आकाराचा, हिम सरोवर वितळून तयार झालेला हा न्यु झीलंड मधील सर्वात मोठा असा हा गोडा तलाव होता.



वकाटिपू तलाव

किंगस्टन पर्यंत हा तलाव आमच्या बरोबर होता. पुढे थोडी फ़ार गावे लागली. त्यातले एक होते ते मॉसबर्न. मॉसबर्न हे न्यु झीलंड मधील हरणाची राजधानी म्हणून ओळखले जाई. न्यू झीलंड मध्ये माओरी लोक आल्यानंतर युरोपियन आले व त्यापैकी एकाने थोडी हरणे आणली व मेंढ्यांबरोबर पाळली. या ठिकाणी हरणासारख्या दिसणार्या मेंढ्या किंवा मेंढ्यांसारखे हरीण देखील पहायला मिळतात. "ते अनाओ" गावापर्यंतचा प्रवास काही गावे, सुके डोंगर, हरण मेंढ्यांचे कळप वगळता ज्यास्त काही पहाण्यासारखा नव्हता. नंतर ते अनाओ तलाव लागला व ०९.४५ वाजता आम्ही ते अनाओ गावात टूर वाल्यांच्या शाखा ऑफ़ीस मध्ये पोहोचलो.

ते आनाऒ तलावाचा पलिकडला तीर

सी गल पक्षी

स्वच्छ असे ते अनाऒ तलावाचे पाणी

ट्रेसी ने तेथेच नाष्टा करण्याचे व दुपारचे जेवण बांधून घेण्याचे सुचवले कारण पुढे काही दुकाने वगैरे दिसणार नव्हती. कॉफ़ी घेऊन झाल्यावर मी थोडे टोमॅटो-चीज आणि लेटेस सॅण्डवीचेस दुपारसाठीला बांधून घेतले. ते अनाओ मध्ये आणखीन ३ पर्यटक चढले. आता आमची बस निघाली होती फ़िओर्डलॅन्ड नॅशनल पार्कच्या दिशेने. हे नॅशनल पार्क संपताच मिल्फ़ोर्ड साऊंड सुरू होतो. थोड्या वेळासाठी ते आनाओ तलावाच्या किनार्यालगत जाऊन आम्हाला एक दरी पहायला ट्रेसीने बस थांबवली. याला एगलिंगटन दरी असे म्हणतात.


एगलिंग्टन दरी
"U" आकाराची अशी ही दरी आहे. सभोवतालच्या हिरव्यागार डोंगरावर कधी मध्येच मातीची एक जाड रेषा दिसायची. सतत पाऊस पडल्यावर माती ठिसूळ होते व आपल्या त्या ठिकाणाची सर्व झाडे मुळापासून खाली गडगडत येतात व एक मातीची लांब आशी जाडी रेषा उमटते. दरड कोसळल्यासारखे चित्र असते पण याच्यात बहुतेक करून मोठ्या झाडांचा समावेश असतो. थोडावेळ फ़ोटो काढून आम्ही परत बस मध्ये बसलो. आता हळू हळू आम्ही नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करत होतो. सुमारे ५-१० मिनिटांनी "मिरर लेक्स" पाहण्याचा योग आला. लहानसा असा एक तलाव आहे ज्यात समोरचे प्रतिबिंब हुबेहुब दिसते.

mirror लेक्स
पुढे थोडावेळ आम्ही एका शौचालयाजवळ थांबलो, कारण हे रस्त्यात भेटणारे शेवटचे सार्वजनिक शौचालय होते. एका लहानश्या नदीच्या किनार्यावरून जात तिथून पुढे आम्ही एक छोटासा घाट चढू लागलो.
आतातर काही पर्वतांच्या शिखरावर पडलेला बर्फ़ ब~यापैकी दिसायला लागलेला. एका सिनीक स्पॉटवर आम्ही थांबलो.

डोंगरांवरील बर्फ़, आम्ही एका सिनीक स्पॉटवर थांबल्यावर


बोगद्यात शिरण्याआगोदर

खूपच सुंदर असा हा स्पॉट होता. काही बर्फ़ वितळत होता व त्याचे रुपांतर झ~यात होत होते. काही ठिकाणी दरडी कोसळत होत्या कारण आदल्या दिवशीच इथे थोडा पाऊस पडलेला. दुसरे एका स्पॉट वर थांबण्याचा ट्रेसीचा विचार होता कारण हा एकतर्फ़ीच बोगदा होता. गाड्यांची फ़क्त एकच रांग या बोगद्यातून जाउ शकते. आम्ही सिग्नलवर उभे होतोच व लगेचच ते सिग्नल हिरवे झाले.


बोगद्यातून बाहेर आल्यावर, ही डोंगरांची रांग


ही नागमोडी वळणे
बोगद्यात मोजकेच दिवे होते व पाणी झिरपत होते. त्या बोगद्याबाहेर आल्यावर आमची बस थांबली. समोर भयानक असे द्रुश्य होते. सगळीकडे डोंगर व नागमोडी वळणे. जागोजागी दरड कोसळल्याचे ताजे निशाण. त्यातले काही डोंगर आम्हाला पार करायचे होते. ट्रेसीने गाडी त्या दिशेला घातली. उंचच उंच डोंगरांच्या कुशीतून जाताना खाली दिसणारी दरी खूपच खोल वाटत होती. क्वचित कुठेतरी मोठा एखादा धबधबा दिसायचा, मात्र कोसळेल्या दरडींच्या भयानक आठवणी सगळीकडेच ताज्या होत्या.

फ़ियोर्डलैंड नॅशनल पार्कच्या सानिध्यात






निसर्ग हाच शिल्पकार

हळू हळू हा नॅशनल पार्क आम्ही पार करत होतो. वर्षाला ६००० मि.मी पेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. मध्ये मध्ये आम्हाला लाल रिबिन लावलेली झाडे दिसत होती. या जातीची झाडे उगवण्याचा प्रकल्प या नॅशनल पार्क ने घेतला होता. बहुतांशी अश्या जातीची झाडे दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्याच बचावासाठी हा प्रयत्न दिसत होता. पुढे एका वॉकिंग ट्रॅक जवळ ट्रेसीने बस थांबवली. जंगलातून जाणारी अशी ही पाऊलवाट एका धबधब्याच्या दिशेने जाते व परत येते. घनदाट असे हे जंगल होते. पाऊस पडल्यामुळे ओल्या फ़ांद्याचा सुवास हवेत मिसळत होता. या पाऊलवाटेत शिरल्यापासून त्या धबधब्याचा आवाज येऊ लागला. सतत वाहणारा हा धबधबा असल्यामुळे हे पाणी जणू सभोवतालच्या दगडांवर शिल्पकाम करीत आहे असे वाटत होते.
एखाद्या शिल्पकारानेच हे दगड कोरलेले असावेत असे वाटत होते. अत्यंत गुळगुळीत व त्यावर जोरात वाहत येणारा पाण्याचा प्रवाह. निसर्गही कधी कधी अजब जादू करून जातो हे येथे (बहुधा न्यू झीलंड फ़िरताना) क्षणाक्षणाला मला जाणवत होते. हा प्रवास कधीच संपू नये असे मला सारखे वाटत होते.

त्या पाऊलवाटेजवळून दिसणारे हे द्रुश्य

मिल्फ़ोर्ड साऊंडच्या दिशेने जाताना हा आमचा शेवटचा स्टॉप होता. ट्रेसीने बस सुरु केली व थोड्याच वेळात आम्ही मिल्फ़ोर्ड साऊंड एअरपोर्ट जवळून जात होतो. डोंगराळ भागात वसलेले हे एअरपोर्ट असल्यामुळे ४-६ सीट्ची विमाने व हेलीकॉपटरच येथे उतरतात. बोइंग ७४७, ७३७ किंवा एअरबस ३०० जातीच्या प्रवासी विमानाचा विचार सोडाच. मिल्फ़ोर्ड वरून क्वींसटाऊनला विमानाने जायाला ३५ मिनिटे लागतात. पण त्याचे एका उड्डानाचे प्रत्येक प्रवासी भाडे ३०० डॉलरपुढे आहे (हेलीकॉपटरचे ४७५ होते !). हौशी, श्रीमंत पर्यटकच हाच प्रवास करतात. थोड्या वेळातच आम्ही मिल्फ़ोर्ड साऊंडच्या जेटी वर आलो. आता आम्ही २.३० तासांचा बोटीचा प्रवास करणार होतो.



मिल्फ़ोर्ड साऊंड जेटी

बोटीतून दिसणारा हा पहिला धबधबा

बोटीने वळण घेतले व आम्ही डोंगरांच्या सानिध्यात जात होतो. पाण्याच्या दोन्हीबाजूला एका रांगेत डोंगर उभेकेल्यागत वाटत होते जणू आमचे स्वागत करायला.


मिल्फोर्ड साऊंड मध्ये शिरताना


वास्तविक मिल्फ़ोर्ड साऊंड हा प्रदेश १५ कि. मी पुढे टॅस्मन समुद्रात संपतो. माओरी भाषेत याला पियोपियोताही असे ही म्हणतात. कवी रुडियार्ड किप्लिंग ने तर याला जागातले आठवे आश्चर्य असे ही म्हटले आहे. अतिशय अरुंद अशी वाट असल्यामुळे हा प्रदेश तसा दुर्लक्षीत राहिला. खरं म्हणजे आत येण्यास हरकत नसे परंतू ढासळत्या दरडीं व वेडे वाकडे वारे यामुळे एखादी मोठी बोट भरकटू शकण्यास काहीच हरकत नव्हती. वर्षाला ७००० मि.मी पर्यंत पाऊस इकडे पडतो त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येथे सदैव घडत असतात.



मिल्फोर्ड साऊंड मधला एक धबधबा


हे क्षेत्र अत्यंत भुकंपप्रवण आहे. ऑस्ट्रेलियन व पॅसिफ़िक प्लेट याच ठिकाणी भेटतात व सध्या या दोन्ही पट्या एकमेकांवर घर्षण करीत आहेत. म्हणूनच इकडल्या काही डोंगरांना मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. असे म्हणतात की या डोंगराच्या दगडांत अनेक धातू सापडतात. काही ठिकाणी आम्हाला निळसर लाल अश्या रंगीत रेषा दिसल्या.


पॅसिफ़िक व ऑस्ट्रेलियन पट्या येथेच घर्षण करतात (मधोमध पहा)


भुकंपामुळे या डोंगराचा काही भागच कोसळला असावा

थोडे पुढे गेल्यावर आम्हाला काही हौशी पर्यटक मासे पकडताना दिसले आणि नंतर लागला तो विशाल टॅस्मन समुद्र.
टॅस्मन समुद्रात आमची बोट आली असता.

येथे आमची बोट जोर जोरात हेलकावे घेत सुटली. काही वेळाने बोट वळली व आम्ही पुन्हा जेटीवर जायला निघालो. आता आम्ही दुस~या डोंगर रांगाच्या पायथ्याजवळून जात होतो.

बोटीतून घेतलेले एक छायाचित्र


प्रथम आम्ही मिल्फ़ोर्ड साऊंड मधला सर्वात ऊंच धबधबा पाहिला. हा धबधबा किमान ५० माळे उंच होता व अती पावसाळी वातावरणामुळे वर्षभर टिकून असतो. असे म्हणतात की, बायकांनी या धबधब्याचे शिंतोडे तोंडावर मारल्यास त्या १० वर्ष तरूण दिसतात. बोटीत अशी घोषणा झाल्यावर सगळ्या बायका त्या धबधब्याजवळ जाण्यास निघाल्या.

धबधब्यापसून पुढे अम्हाला काही सुस्त सील प्राणी दिसले. आम्ही नानाप्रकारे त्यांना आवाज करून पाहिले पण काही साद मिळाली नाही. बोट तशीच पुढे जात होती. नंतर एके ठिकाणी दुसरी बोट तयार होत होती. एव्हाना दुपारचे ३.३० वाजून गेलेले व ही बोट रात्रीच्या सफ़ारीला तयार होत होती.


५० माळे उंचीचा धबधबा



सील प्राणी
रात्रीची सफ़ारी

या ठिकाणी रात्रीचे द्रुश्य पाहण्यास/ विविध प्रकारचे आवाज ऐकण्यास एक वेगळीच मजा असते असे म्हणतात. समोर आता आम्हाला ती जेटी दिसत होती. एअरपोर्ट वरून विमाने/ हेलिकॉप्टरांची उड्डाने होत होती. आमच्या पुढे ३-४ बोटी होत्या व त्यांना जेटीत जागा मिळेपर्य़ंत आमचा प्रवास थोडा मंदावला. आखेर ४ वाजता आम्ही पुन्हा जेटीवर उतरलो. निघताना आम्हाला धन्यावाद करीत आम्ही आमची ’रियल जरनीज’ ची बस शोधायला निघालो.

आमची बस

आमच्या पैकी बरेच जण विमानाने परत क्वींसटाऊनला जाणार होते. म्हणून आम्ही मोजकेच ५-६ जणं परतीच्या प्रवासाला बसने निघालो. ट्रेसी तयार होतीच. आमची विचारपूस केल्यावर ४.१५ पर्यंत आम्ही आमच्या मार्गावर होतो. खरोखर स्वर्ग फ़िरल्यासारखे वाटत होते. मनात आनंद होता आणि दु:ख ही. चेह~यावर हसू ही होते आणि रडू ही. आज माझा दिवस निसर्गाच्या सानिध्यात फ़ार छान गेला. दु:ख याचेच की मला दुस~या दिवशी परतीच्या प्रवासाला (ऑस्ट्रेलियाला) निघायचे होते. बसचा क्वींसटाऊनला जाण्याचा मार्ग तोच होता. मी थोडी झोप काढली व टे अनाओ आल्यावर आमच्यातली ३ मंडळी येथे उतरली. होटेलवर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ०७.४५ वाजले. तसा अजून खूप उजेड होता. आंघोळ करून मी जेवण आणले व येऊन जेवलो. झोपावे का असा विचार केला पण बाहेर उजेड पाहून आत राहवत नव्हते. क्वींसटाऊनला शेवटचा फ़ेर फ़टका मारून यावे म्हणून मी खाली उतरलो. वकाटिपू तलावाच्या बाजुने समोरचे सौंदर्य पहात हळू हळू चालत होतो.

वकाटिपूच्या किना~यावरून घेतलेले क्वींसटाऊन शहरासभोवतालचे डोंगर


मन खूप खिन्न झालेले. खरं म्हणजे न्यु झीलंड ला आल्यापासून, कधी निघायचं?, हा विचारच मनाला शिवला नाही. एकदम असा विचार आला व खूप सुन्न झालो. इतका सुंदर देश पाहून मनात खूप ओढा निर्माण झालेला. पुन्हा इतकी सुंदर वेळ येईल का? हाच विचार मनात होता. तासभर तरी मी तलावाच्या किना~यालगत चाललो असेन. आता अंधार पडला होता.


न्यू झीलंड मधली शेवटची रात्र



मॉल ही आता बंद होत आलेला. समोरच्या बस स्टॉप वर दुस~या दिवशीची बसची वेळ पाहून मी नाइलाजाने होटेलचा रस्ता पकडला. रूमवर आल्यावर मी सर्व फ़ोटो पाहू लागलो. रात्री ११.३०च्या सुमारास बॅगा भरायला सुरुवात केली व सगळं आटपून माझ्या बालिष मनाला समजावत गाढ झोपी गेलो.





प्रकरण सहावे: परतीचा प्रवास



आखेर तो दिवस उजाडलाच. निघे पर्यंत ०८.३० झालेच. चेक आऊट केले व ०८.४५ची बस पकडून मी एअरपोर्टवर गेलो. ९.१५ पर्यंत पोहोचलो असेन. क्वींसटाऊन पासून ब्रिसबेनला जाण्यास थेट विमानसेवा नव्हती. म्हणून परत क्राइस्टचर्चला येणे भाग होते. विमान लाहानसेच होते.बरोबर १०.२५ ला आम्ही उडडान केले. क्राइस्टचर्च पर्यंतचा प्रवास सुमारे ५० मिनीटांचा होता. आजूबाजूला डोंगर असल्याकारणाने विमान थोड्यावेळ तेथेच घिरट्या घालत होते. एक ठराविक उंचीवर आल्यावर आम्ही हळू हळू काही डोंगर पार करू लागलो. दूर असे मिल्फ़ोर्ड साऊंडचे डोंगर दिसत होते.
क्वींसटाऊन वरून उडडान केल्यावर

मिल्फोर्ड साऊंड्चे डोंगर


कदाचित हे वनाका व हवे तलाव असावेत असा अंदाज आहे


क्राइस्टचर्चमध्ये शिरताना

मिल्फ़ोर्ड साऊंडची खडतर वाट दिसत होती व म्हणूनच पर्यटकांना ३०० कि.मी चा वळसा घालावा लागतो. माऊंट कूकचे शिखर याच डोंगर रांगेत दडले होते. वाट काढणा~या नद्या, वितळलेले हिम तलाव दिसत होते. द्रुश्य इतके सुंदर पण वेळ फ़ारच कमी. विमानात दिलेले सॅंडविच सुद्धा खायला मला वेळ नव्हता.
जस जसे क्राइस्टचर्च जवळ येत होते, हिरवीगार शेती, दिसू लागली. डोंगर दूरवर जाऊ लागले व सपाट जमीन दिसू लागली.

क्राइस्टचर्च


काही ठिकाणी शेतात फ़वारणी सुद्धा चालू होती. इकडे फ़वारणी साठी शेताच्या मध्यभागी एक मोठे गोल असे सडपातळ यंत्र उभारतात व हे यंत्र पूर्ण शेतात गोल फ़िरते व शेतास पाणी मिळते. थोडेफ़ार अशीच शेती दिसल्यावर आम्ही क्राइस्टचर्च मध्ये ११.१५ उतरलो.


ब्रिसबेनचे विमान संध्याकाळी ४.०० वाजता होते. तर थोडा वेळ होता. माझा विचार होता की सामान लगेजला टाकून क्राइस्टचर्चला एक पुन्हा फ़ेरफ़टका मारून यावे. पण एअरलाईन काऊंटर बंद होते. सामान ठेवण्याची व्यवस्था पण नव्हती. म्हणून मी तिथेच बसून हा ब्लॉग लिहू लागलो. थोडेसे खाऊन शेवटी दुपारी २.३० वाजता चेक इन केले व ब्रिसबेन विमानाची वाट पाहू लागलो. दुपारी ३.४५ पर्यंत आम्ही आत होतो. पण ४.२५ वाजून गेले तरी विमान सुटले नव्हते (तसे माझे परतायचे मन सुद्धा नव्हते, पण नाइलाज होता). नंतर कळले की विमानात २ बॅगा अधिक चढवल्या गेल्या आहेत. या गडबडीत दुसरा अर्धा तास गेला. आखेर संध्याकाळी ५.१५ पर्यंत आम्ही आकाशात होतो.

आता आम्ही ग्रेमाऊथच्या दिशेने जात होतो. वाटेत काही डोंगर, नद्या व नंतर ग्रेमाऊथचा किनारा दिसला.



क्राइस्ट्चर्च वरून उड्डान केल्यावर

ग्रेमाऊथ जवळचा पूर्व किनारा

संपले न्यू झीलंड

हळू हळू आम्ही तो किनारा सोडला व आता टॅस्मन समुद्रावरून ब्रिसबेनच्या दिशेला लागलो.

उड्डान उशीरा झाल्याकारणाने आमचे आगमन ही १.३० तास उशीराच झाले. ब्रिसबेनला स्वागत मात्र मोठ्या दणक्यात झाले. उन्हाळा असल्याकारणाने कधी कधी संध्याकाळी येथे विजांच्या कडकडाटसह तूफ़ान पाऊस पडतो. तेच होत होते. जवळ जवळ अर्धा-पाऊण तास आम्ही ढगांच्या कुशीतून जात होतो. सुरुवातीला हे ढग पांढरे दिसले पण हळू हळू यांचा रंग बदलत काळा झाला. विमानात कधी उजेड तर कधी काळोख पसरायचा व ७३७ जातीचे लहान विमान असल्याकारणाने सारखे विमान हलत होते व ते पोटात जाणवत होते. कानाचा पडदा कधी बंद होई तर कधी उघडे. हा खेळ जरा विचित्रच होता. सुरुवातीला पायलटने, "आपण उतरायच्या प्रयत्नात आहोत" असे कळवले पण थोड्यावेळाने घोषणा आली की खाली तूफ़ान पाऊस असल्याकारणाने समोरचे फ़ार मोजकेच दिसते व म्हणून एअरपोर्ट सुद्धा बंद आहे. त्यात माझ्या सहप्रवाशी म्हणतो की "मला असल्यावातावरणातून जाणारे विमान व येणारे अनुभव खूप आवडतात" . त्यानंतर तर २-३ किंचाळ्या देखील आम्ही ऐकल्या. आता तो सहप्रवाशी खूपच घाबरला व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मला पुन्हा म्हणाला "आता मला घाम फ़ुटतो आहे रे !"
थोडा वेळ असाच गेला व नंतर पायलट ने ’नोज डाइव आप्रोच’ मारली, विमान तिरके झाले आणि आमचे विमान धावपट्टीवर अपेक्षेपेक्षा जरा जोरातच आदळले. बाहेर येऊन क्लीयरंस केले व बॅगा घेऊन मी सरळ घरचा रस्ता धरला.
माझी न्यू झीलंड ट्रिप शेवटी संपुष्टात आली. आता सोबत होती ती फ़क्त आठवणींची. पुन्हा अशी वेळ कधी येइल हे आता तरी सांगणे फ़ार कठीण दिसते. पण आता पर्यंत झालेली ही माझी सर्वात छान ट्रीप होती असे मला म्हणायला काहीच हरकत नाही. ईश्वरक्रुपेने ती सुखरूप ही झाली. मुख्य म्हणजे ही ट्रीप ३-४ ट्रॅवल एजंटकडून थोडीफ़ार माहिती काढून मी स्वत: आखली होती. ८ दिवसांचा पुरेपूर आस्वाद मला घेता आला. सहप्रवाशी ही चांगले भेटले. अजूनही कधीकधी फोटो पाहताना ते द्रुश्य माझ्या डोळ्यांसमोर प्रकट होते व मी स्वत:ला त्यात हरवून बसतो.
धन्यवाद

--मंदार गुजराथी.

ई-मेल संपर्क:

Mandar Gujrathi