Wednesday, June 10, 2009

उन्हाळा विशेष : चौल-रेवदंड्यातले माझे २२ दिवस.

खास आमच्या लाडक्या दोस्ताची कहाणी, सादरकर्ते: श्री. श्रेयस मोहिते.

प्रकरण पहिले: परीक्षा संपली आणि....
१२वी चे वर्ष म्हटले की डोक्याला ताप ! कुठे जायचे नाही का हिंडायचे नाही. कॉलेज/क्लासमधून वेळेवर घरी या आणि एकदाचे अभ्यासाला बसा ! तसा घरी कोणी लहान भाऊ-बहीण नसल्यामुळे, सगळा घसरा माझ्यावरच पडायचा. वर कॉमप्युटर बंद करून ठेवलेला. त्याच-त्याच "रुटींन"चा मला नुसता वीट आला होता. म्हणून मी ठरवलं, एकदा परीक्षा आटोपल्यावर मी काही थांबणार नाही. मिळेल ते वहान पकडून आधी जाणार माझ्या चौलला ! १४ मे ला मी मुंबई सोडली. गुरुवार होता वाटतं. या आधी लौंच मधून प्रवास मी केलेला. म्हणून मला या प्रवासात काही वेगेळेपणा हवे होता. मी विचार केला की यावेळी चला रेल्वे ने जावुया.

तसं दादर-रत्नागिरी पॅसेंजरचं वेळापत्रक पाहिले. मुलुंड स्टेशनला पोहोचलो. तिकीट खिडकी वर जाऊन पैसे दिले. ५० ची नोट.
"एक पेणचं तिकीट द्या हो !"
"तीन रुपय़े आणखीन द्या"
मला आश्चर्य वाटले, "तीन रुपय़े? त्रेपन्न रुपये तिकीट? ते ही फ़क्त पेण पर्यंत?"
"नाही हो तेरा रुपये तिकीट आहे", पलीकडून तो मास्तर माझ्या अंगावर खेकसला !
हे मास्तर लोक सुद्धा वैतागवाडीची कामे कशाला करतात कोणास ठाऊक. रेल्वे मध्ये इतकी कामे आहेत. जाऊदे, सरकारची कामे वैतागवाडीचीच असतात.
मी विचारले, "फ़क्त तेरा"?
"हो, घ्या !"
चाळीस रुपये सुटे आणि ते तिकीट असे माझ्याकडे टाकून तो मागच्यावर वैतागायला तयार झाला !

विचार केला १३ रुपये म्हणजे स्वस्तच आहे. ४.१० ला रेलवे ठाण्याला आली. ६.०० वाजेपर्यंत पेण गाठले. गाडीत अलिबागला रहाणारा आणि मुंबई पोलिस मध्ये हवालदार असणारा एक आग्री होता. त्याच्याशी ओळख झाली. मी पहिल्यांदाच जात होतो म्हणून त्याला पेण ला उतरल्यावर एस.टी पकडायला कसं जायाचं हे विचारून घेतलं. अलिबाग पर्यंत तो होताच माझ्याबरोबर. त्याचं नाव, ते काही मला आता आठवत नाही, पण मला ट्रेन मध्ये खिडकीची सीट मिळाली, बरे वाटले. आपट्याला पनवेल नंतर दिसणारे ते मळे, अजून हिरवे होते. उन्हाळ्यात सुद्धा निसर्गाचे ते नटलेले रूप पाहत पाहत पेणला शेवटी १३ रुपयात पोहोचलो. बाहेर येताच तेवढयात अलिबाग एस.टी मिळाली.

तो हवालदार होताच बरोबर. मग अलिबाग पर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. कसा तो चंद्रपूर ला ट्रेनिंगला होता, किती कठीण त्याचे ट्रेनिंग होते, सर्व सांगत सांगत शेवटी १.१५ तासात आम्ही अलिबागला पोहोचलो. रेवदंडा एस.टी ला वेळ होता. पण मी सिता~याच्या स्टँड जवळ आलो. सिता~यात पुढे बसायला मला आवडतं, म्हणून मी पुढेच बसलो. सितारा सुटला, जेमतेम अलिबाग बायपासजवळ आलो. समोरहून येणा~या एका सिता~याने आम्च्या सिता~याच्या ड्रायवर ला काही तरी खूणवलं. मला एक समजत नाही, समोरासमोरून येणारे हे एस.टी वाले, ट्र्क वाले, इकडले सितारेवाले आणि दोन मुंग्या हाताने काही न काही कुजबूज केल्याशिवाय पुढे जातच नाहीत. बहुधा विरुद्ध दिशेला ट्रॅफ़िक जाम आहे का हे खुणवत असवेत ! आमचा सितारावाला मला आणि माझ्या बाजूच्या एका माणसाकडे पाहून बोलला, उतरा खाली, लवकर उतरा.

पुढे मला काही पोट पुढे असलेली माणसे दिसली. ड्रायवर बोलला, पुढे तपासणी सुरु आहे उतरा लवकर लवकर. ६ सिटर असल्यामुळे मला आणि माझ्या बाजुच्या माणसाला उतरावे लागले. कारण पुढे बसाय़ला परवानगी नाही.
अलिबाग बायपासच्या आधी उतरलो. रात्रीचे ०७.३० झालेले. तसा ज्यास्त अंधार नव्हता. ती पोट पुढे असलेली माणसं पर्यावरण टॅक्सच्या नावाखाली पोटं भरत होती. त्यांच्या बूथच्या बाहेर हातात बॅग घेऊन मी उभा राहिलो.
त्यातल्या त्यात मी त्या बुथ मॅनेजरची ओळख काढली. नाव काही लक्षात नाही पण तिकडेच बस्तान आहे त्याचे.
त्याला काय, टॅक्सच्या नावाखाली फ़ुकट सातवी सीट मिळत असेल.. असा किंचीतसा विचार माझ्यामनाला शिवला. तसा तो चांगला होता, कारण त्याने माझ्यासाठी शिट्टी वाजवून एक एशियाड थांबवली. तिकडे स्टॉप नव्हता. देव त्याचे भले करो. त्याचे आभार मानून मी निघालो. थकून-भागून प्रवीण दादाच्या घराच्या इथून माझ्याघरी आलो. घरी पोचायला ८ वाजले.
वहिनीने मला स्वयंपाक घराच्या खिडकीतून बघितलं.
"काय रे आलास? ये घरी."
"येतो हो...घरी जाऊन येतो", मी उत्तर दिले.
घरी गेलो. अंगणात पाय ठेवतो तीच रास पडलेली. कच्चे छोटे अर्धे खाऊन टाकलेले आंबे...माकडं आणखीन कोण?
खूप भूक लागलेली. आजीने लगेच हात-पाय धुतल्यावर जेवण दिले. सार आणि भात. मुंबईत कोठे मिळतंय सार.
मला तरी मिळाले नाही कधी. जेवलो ९.०० पर्यंत. आणि आता पुढे पोखरण कट्टा होता
टॉर्च घेऊन पोखरणीवर पोचलो. सगळे मित्र बसलेले. त्यांना भेटून खूप बरे वाटले. खूप दिवसानी भेटलेले. रात्री घरी यायला उशीर झालाच. आजीची कूर-कूर सुरू होतीच. पण मी झोपी गेलो. इतकी छान झोप कित्येक दिवसात लागली नव्हती.

प्रकरण दुसरे: श्रावंदे कडे लग्न आणि आमची मस्ती........